माझी टवाळखोरी !!!! .....
क्रिएटिवीटी रोज एक , भले असो टुकार अन फेक ; a.kelkar9@gmail.com, ९८१९८३०७७० (अपराध माझे कोट्यानुकोटी , तरीही करितो अजून एक कोटी ) ...संकल्पना : अमोल केळकर
नक्की ऐका
मी विडंबनकार कसा झालो
नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा आज दि. १६ सायं. ७ वा. l भाग २८९ l कथावाचन l लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...
Sunday, January 25, 2026
Friday, January 23, 2026
एक 'सायकल' द्या मज आणूनी
पुण्यात झालेली जागतिक सायकल स्पर्धा आणि त्याचे पुणेकरांनी केलेले गोड ( चितळे अंबा बर्फी पेक्षा गोड) कौतुक पाहून / वाचून आम्ही भारावून गेलो आणि म्हणावेसे वाटले
एक 'सायकल' द्या मज आणूनी
चालविन मी जी स्व-पायाने
पालथी घालून सगळी पेठे
दीर्घ जिच्या त्या घंटीने
अशी सायकल द्या मजलागुनी
चमत्कार पुण्य नगरीतुनी
सुंदर सोज्वळ रस्ते मोठे
पलिकडले ते सगळे खोटे
म्हणती धरूनी ढेरी पोटे
घेऊन सायकल येतो फिरुनी
गतीचे वाजवूनी अवडंबर
स्पिडगनाचे असती अडथळे
विसरुनिया जे जातात खुळे
न-वले पूल जेथे न टळेल
कर्म होतसे तेथेच स्थिर
प्राप्तकाल हा विशाल धूसर
सुंदर रस्ते तयात खोदा
नियमाने त्यावरती नोंदा
पोल्यूशनचा चेंदामेंदा
विक्रम काही करा चला तर
एक 'सायकल' द्या मज आणूनी
( सायकलसूत) अमोल
#माझी_फुसकुंडी 📝
२४/०१/२६
Saturday, November 29, 2025
वृक्ष वल्ली नसे सोयरी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्याने सध्या जी 'झाडाझडती' सुरु आहे त्यावर
( अर्थात तुकोबांची माफी मागून 🙏🙏)
🌳🌴🌳🌴🌳🌴🌳
वृक्ष वल्ली नसे सोयरी
तपोवनी
वस्ती ही सोईने घालविती !
येणे ' गुरु' सिंहे, मेळाव्याचा वास
तोडा झाडी खोड, वाटे येता !
आकाश मंडप पृथवी आसन !
जमे तिथे घाव, गोदा- तिरी!
तोडलेली मोजून, परवडी विस्तार
सरकारी प्रकार, नसे रुची !
तुका म्हणे होय, जनाशी संवाद
नास्तिकाचा वाद आस्तिकांशी !!
🌳🌴🌳🌴🌳🌴🌳
#माझी_फुसकुंडी 📝
२९/११/२५
Thursday, November 20, 2025
मरोळ नाका
घाटकोपर - वर्सोवा मार्गावरील, मरोळ नाका हे साधारण मधले स्थानक. सकाळ संध्याकाळ दोन्ही बाजूने या स्टेशनला इतकी गर्दी असते की कुणाला मेट्रोतून उतरणे/ किंवा मेट्रोत चढणे फार अवघड जाते.
या स्थानकाचे ' *फेविकाॅल मरोळ नाका'* हे जे नाव आहे , ते बदलून तरी काही फरक पडतो का,
हे बघावे, अध्यक्ष महोदय 😛
#माझी_फुसकुंडी 📝
२१/११/२०२५
Tuesday, November 11, 2025
भूखंड घेतला लांब
विडंबनवर असलेली पूर्ण स्टॅम्प ड्यूटी वगैरे भरुन आणि गदिमा,बाबूजींची माफी मागून 🙏🙏
( *मनोरंजन हा हेतू)
नाही खर्चली कवडीदमडी, नाही भरला दाम
भूखंड घेतला लांब, दादा मी भूखंड घेतला लांब
कुणी म्हणे ही असेल चोरी
कुणा वाटते असे उधारी
जन्मभरीच्या श्वसाइतके ढापियले मैदान
भूखंड घेतला लांब
बाळ गुराखी मुठेवरचा
वचक असे सर्वांवरचा
हाच आत्याचा भाच्चा आणि युतीचा अभिराम
भूखंड घेतला लांब
जितके मालक तितकी नावे
पुण्यनगरी यांची गावे
सर्वही ओळखी देती 'देवा' 'क्लिन चीटचा' पैगाम
भूखंड घेतला लांब, दादा मी भूखंड घेतला लांब
#माझी_फुसकुंडी 📝 *
१२/११/२५
Monday, October 27, 2025
ही वाट वाट लावे
दिवाळी सुट्टी संपवून सुट्टीच्या शेवटच्या रविवारी आपल्या गावाकडून, कामाच्या ठिकाणच्या गावाकडे येतानाचा अनुभव
( *गाव सोडून जायची हुरहुर आता मागे पडून, ट्रॅफिक जाम ची भिती ही सध्या वरचढ ठरतीय*)
शांता शेळके यांची माफी मागून 🙏
ही वाट 'वाट' लावे, पुण्याबाहेरच्या गावा
माझ्या मनातला का, तेथे रस्ता नसावा?
ही वाट 'वाट' लावे,
जिथे तिथे घुसाया, वाहन आसुलेले
नाक्यावरती टोलच्या, मडगाड ठोकलेले.
इथे मोठ्या खड्ड्यांनी, टायर फुस्स व्हावा
माझ्या मनातला का, तेथे रस्ता नसावा?
ही वाट 'वाट' लावे,
घे वाहन कडेला, थांबून ढाब्यापाशी
लागून भूक भारी मग खा वडा पावाशी
एकदाच 'जी - पे' चा, पासवर्ड विसरावा
माझ्या मनातला का, तेथे रस्ता नसावा?
ही वाट 'वाट' लावे,
स्वप्नामधील गावा, पुण्यातून न जावे
स्वप्नामधील रस्त्याला, स्पिड ब्रेक न यावे
स्वप्नातल्या सुखाचा ,'टुकार' वेध घ्यावा
माझ्या मनातला का, तेथे रस्ता नसावा?
ही वाट 'वाट' लावे,
#माझी_फुसकुंडी 📝
२७/१०/२०२५
Saturday, October 18, 2025
्दिवाळॊ पहाट
दिवाळी पहाट 🎇
मंडळी, नमस्कार 🙏
आज शनिवार. दिवाळी तर सुरू झालीय. कदाचित उद्यापासून ब-याच ठिकाणी पुढील काही दिवस 'दिवाळी पहाट' चे आयोजन असेल. आजपर्यंत टीव्हीवर लाईव्ह/ किंवा यू ट्यूब्जवर पाहिलेल्या कार्यक्रमातून एक गोष्ट लक्षात आली ती अशी'-
भक्ती गीते / अभंग हा दिवाळी पहाट कार्यक्रमाचा प्रमुख गाभा असतो. आता कुठलाही अभंग घ्या
उदा. ' अवघा रंग एक झाला'
आता हे गाणे रेडिओ, टीव्ही किंवा कुठल्याही कार्यक्रमात गायक/ गायिका सादर करताना पहिल्या ओळीपासून ( धृ) म्हणजे ' अवघा रंग एक झाला ' पासून गायला सुरवात करताय
पण, जिथे गायक / गायिका
'रंगी रंगला श्रीरंग ' पासून सुरवात करुन, मुळ २-४ आलाप असताना वेगवेगळ्या ५-६ आलाप घेऊन ३ मिनीटाचे गाणे १० मिनिटांनी संपवतात तो कार्यक्रम म्हणजे
" दिवाळी पहाट "
( निवेदन चालू असताना ना तिकडे गायक - वादकांचे लक्ष असते ना रसिकांचे, हा वेगळाच मुद्दा)
अशी अनेक उदाहरणे पुढील काही दिवसात ऐकायला/ पहायला मिळतील.
असो तुमची दिवाळी खूप मस्त जावो याच
✨💫 #माझी_टवाळखोरी📝✨🌟
अनुदिनीच्या सर्व वाचक, स्नेही, मित्र परिवार यांना शुभेच्छा 🙏
अमोल केळकर
poetrymazi.blogspot.com
Saturday, September 13, 2025
रुक जाना नही, तू कही हारके '
' रुक जाना नही, तू कही हारके '
आजच्या रंगोलीतील या गाण्याने लक्ष वेधले. आजची रंगोली जरा विशेष वाटली. साधारणत: रंगोलीची एक थीम असते. त्या आठवड्यातला प्रसिध्द नट,नट्या, दिग्दर्शक, संगीतकार, गायक,पटकथाकार,निर्माते यांचे वाढदिवस, जन्मतिथी किंवा पुण्यतिथी नुसार गाणी असतात. किंवा मागे-पुढे येणाऱ्या विशेष दिनाची ( १५ आँगस्ट, होळी, दहीहंडी,दिवाळी, गणेशोत्सवव ) गाणी असतात.
आजची रंगोली मात्र वरील उल्लेख केलेल्या पैकी काही नव्हते तर चक्क motivational गाणी ही 'थीम' होती
त्यातील सुरवातीची गाणी
मै जिंदगी का साथ निभाता चला गया..
एकदिन बित जायेगा..
जिंदगी एक सफर है सुहाना..
आनेवाला पल,जानेवाला है..
आणि नंतरचे 'रुक जाना नही '
हे गाणे ऐकले की मुळ गाण्यापेक्षा आमच्या तारूण्यात आलेला संजय मांजरेकरचा या गाण्यावरचा एक अल्बम आठवतो
मांजरेकरांचे त्यावेळी करिअर थोडे डळमळीत झाले होते आणि हा अल्बम आला होता
विविध कार्यक्षेत्रात काम करणा-यांच्या आयुष्यात अशी वेळ येऊ शकते. त्यावेळी एकदा हे गाणे ऐकायचे आणि पुढे जात रहायचे
#knightofpentacle हे कार्ड ही हेच दर्शवते
#माझी_फुसकुंडी 📝
१४/०९/२५
अवांतर: टॅरो कार्डस हा आपला आवडीचा विषय. चक्क हा विषय घेऊन TAROT नावाचा एक इंग्रजी हाॅरर सिनेमा ( आणि एक कोरियन सिनेमा) निघालाय. याबद्दल परत केंव्हा तरी
Tuesday, July 1, 2025
शाळा सक्ती
" मुलांना शाळेची सक्ती केलीत तर खबरदार! "
असा दम देणारा पक्ष आमच्या शालेय जीवनात पाहिजे होता
कायमचा पाठिंबा दिला असता ☺️
असो, एक अवांतर गोष्ट
खुप खुप वर्षांपुर्वी आपल्या मुंबापुरीतील एका लाकूडतोड्याची 'मराठी कु-हाड' वाशी खाडीत पडते.
.
( पुढे काय घडले हे मी सांगायला नको पण लेखन वाढवण्यासाठी देत आहे)
त्रिभाषिक सुत्राचे सर्वोसर्वे उदास लाकूडतोड्याला पाहून प्रकटतात आणि त्याची कु-हाड त्याला देतात
तो म्हणतो ही इंग्रजीची आहे माझी नाही
मग सर्वोसर्वे दुसरी कु-हाड देतात, ती हिंदीची निघते
शेवटी मराठीची कु-हाड आणून सर्वोसर्वे लाकूडतोड्याच्या प्रामाणिक पणावर खुश होऊन तिन्ही भाषिक कु-हाडी लाकूडतोड्याला देतात
आणि म्हणून..
आमच्या मुंबापुरीच्या माथी इंग्रजी, हिंदीची पण कु-हाड कायमस्वरूपी आहे.
कुठली कुठल्या वेळी चालवायची हे मात्र तोच ठरवू शकतो
अवांतर संपलं
(पहिल्या ३ ओळींतर पुढे)
पण शाळेत गेलो नसतो तर यापेक्षा बेकार सुचलं असतं 😁
माझी_फुसकुंडी 📝
०२/०७/२५
Monday, June 2, 2025
जागतिक सायकल दिन
" अमुक तमुक जागतिक दिनाच्या " वर्गीकरणात आज ३ जून ला
जागतिक सायकल दिन 🚴🏽🚴🏻♀️🚴♂️
साजरा होतो
एक जमाना होता ब-याच जणांना 'माय'कल
माहित नव्हता, ( हेच मराठीत :अभ्यासात तुझा 'कल' कुठे आहे? या प्रश्णाचे उत्तर ही नसायचे ) पण 'सायकल' ही गोष्ट मात्र जीवाभावाची असायची
बालपणी तीन चाकी सायकल पासूनचा सुरु झालेला आणि आज चार चाकी गाडीला मागे सायकल लावून पिकनिकला जायचे इथेपर्यंतचा अनेकांचा प्रवास थक्क करणारा वाटतो.
'सायकल' हा मराठी सिनेमा आणि 'सायकल' स्पर्धा यावर आधारित 'जो जिता वही सिकंदर' हा हिंदी सिनेमा मनात कायम स्वरूपी स्टॅन्ड ( घर करून) लावून आहे.
यानिमित्याने आमच्या तमाम सायकल प्रेमी मित्र- मंडळीना आजच्या दिनाच्या अनेक शुभेच्छा 🏆🥇💐💐
चलाते रहो !
( वडाप प्रेमी) अमोल 📝
अवांतर: जागतिक वडाप ( वडा-पाव नव्हे ) दिन केंव्हा असतो रे भौ!
#माझी_फुसकुंडी
#जागतिक_सायकल_दिन
०३/०६/२०२५
Sunday, June 1, 2025
दख्खनची राणी वाढदिवस
वाढदीवस @ मुंबई ०१.०६.२०२५
वाढदिवसाला
कुणाला बोलावले जात नाही. जो तो हौसेने ,प्रेमाखातर येतो.उपस्थित रहायचा खर्च किमान १० रु
सकाळचा वाढदिवस जोरात होतो. सजावट दणक्यात असते. केक ही कापला जातो
संध्याकाळी त्यामानाने फारच थोडा अवधी असतो. दहा मिनीटे मिळतात फक्त, तरीही जमेल तसे सेलिब्रेशन होते
आज अनायसे रविवार असल्याने संध्याकाळच्या पार्टीत जाता आले. १०० व्या वेळी एकत्रच प्रवास करायचा मानस आहे, बघू
#deccanqueen
#दख्खनची_राणी
#नाबाद९६
Monday, May 26, 2025
प्रती दक्षिणद्वार सोहळा
आमच्या नरसोबावाडीला कृष्णेचे पाणी मंदिरातील पादुकांवरुन दक्षिण दरवाजातून बाहेर पडले की 'दक्षिणद्वार सोहळा' संपन्न होतो
याच प्रमाणे " प्रती दक्षिणद्वार सोहळा " दरवर्षी आमच्या मुंबईत साजरा करायला हरकत नाही
सिद्धीविनायक मेट्रो स्टेशनवर पाणी घुसून, आचार्य अत्रे मेट्रो स्टेशनला दक्षिण दरवाजातून पाणी बाहेर आले की
" अँक्वा दक्षिण द्वार सोहळा" संपन्न झाला असे समजायचे
#माझी_फुसकुंडी 📝
२७/०५/२५
Friday, April 18, 2025
बंबईया हिंदी
'संपर्कासाठी भाषा' हा उद्देश ठेऊन जर तिसरी भाषा शिकवायची असॆल तर २३ वी राज्यभाषा म्हणून तत्काळ
' बंबईया' हिंदी ला मान्यता देऊन तिचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा ही विनंती, अध्यक्ष महोदय !
शिकण्यास, आत्मसात करण्यास सोपी.
घरातून निघाल्या पासून रिक्षा,बस,रेल्वे स्टेशन, लोकल,मेट्रो मुंबईतील प्रेक्षणीय ठिकाण,शाळा, कार्यालये ते परतीचा प्रवास , सगळीकडे कायम बोलली जाणारी ही भाषा पहिली पासून मुलांना ( किमान MMRDA क्षेत्रातील ) शिकवली तर ते त्यांना पुढील आयुष्यात फायद्याचे ठरेल.
मातृभाषेची 'मुळं'
बंबईया हिंदीची खोडं'
आणि awesome हिंग्लीश ने भरलेली 'पानं फुलं '
असा हा भाषेचा वटवृक्ष, त्री-भाषा सूत्राचा कल्पवृक्षच जणू
परीक्षेतील काही प्रश्ण
१) वडा-पाव कसा मागाल?
उत्तर: भाऊ, दो- वडा पाव 'पार्सल',
' चटणी' मत लगाना
२) पब्लिक ट्राॅस्पोर्ट मधील संवादाची उदाहरणे द्या.
उत्तर: अ) कंडक्टर : सुट्टा देना,सुट्टा देना. मेरे पास मोड नही है!
ब) गर्दीच्या लोकल मधे- ए भैया, सरक बाजूला, बिच मे काय को खडा है बे !
३) मित्र/ मैत्रीणींमधील संवाद
उत्तर : out of सिलॅबस, हे शिक्षण १ ते ४ थी अभ्यासक्रमात सध्या तरी नाही
आणि म्हणून
या भाषेची लागवड पहिली पासूनच करावी ही परत एकदा सभागृहाला विनंती
( बंबईका सब से बडा स्ट्रगलर) अमोल 📝
#माझी_फुसकुंडी
१९/०४/२५
poetrymazi.blogspot.com
Saturday, March 15, 2025
आका' करुणा- करा,
आज तुकाराम बीज. त्यांचीच एक रचना सध्याच्या घडामोडींवर
'आका' करुणा- करा, करितसे धावा
या मज सोडवा लवकरी
ऐकोनिया माझी, 'अंजनीची' वचने
घ्यावे 'दमायणे' वाचावीळ
मागे - पुढे अवघा असे बीड ठाव
मारुनी पायी भाव, खोकी घ्यावे
उशीर तो आता न पाहिजे केला
अहो जी ' देवेंद्रा ' वायदे-बाप।
उरले ते एक हेचि मज आता
अवघे विचारीता 'पद' गेले
तुका म्हणे आता करी कृपा दान
'कायदे ' समान दावी जना
#माझी_फुसकुंडी 📝
#तुकाराम_बीज २०२५
Tuesday, March 11, 2025
(अ)स्वच्छ गंगे भागीरथी
विद्याधर गोखलेंची माफी मागून.
( प्रासंगिक)*
(अ)स्वच्छ गंगे भागीरथी
'हड' म्हणती टिकारथी *
चिदानंद-शव- करोनाची वाहवत नेली ही किर्ती !
आणिक घेऊनि तुला शिरावर गाई भक्त तव महती!
(अ)स्वच्छ गंगे भागीरथी !
निर्माल्यधारा तव जलधारा अमृतस्नानी अंगावर्ती
पवित्र पवित्र ! जय तीर्थ कुंभ-कर
लहरी जनता निनादती !
(अ)स्वच्छ गंगे भागीरथी !
#माझी_फुसकुंडी 📝
फाल्गुन शुक्ल त्रयोदशी
१२/०३/२०२५
Thursday, March 6, 2025
भय इथले संपत नाही
कवी ग्रेस यांची माफी मागून
'भय्य' इथले संपत नाही,मज मराठी आठवण येते
मी संध्याकाळी येतो,तू मला'केम छो' म्हणते
ते डोसे खाऊगल्लीचे,ती घाटकोपरची माया
जोश्यांना ऐकले आपण, जोशात पुन्हा उगवाया..
तो बोल मंद फसवसा,हृदयास तोडूनी गेला
भाषेच्या वनवासाने अजून आघात झेलला
फाफड्यात जिलबी अवघी, ऐकते दु:ख पोह्यांचे
हे सरता संपत नाही,मरण राजभाषेचे
#माझी_फुसकुंडी 📝
०७/०३/२५
तळटीप: सुबह का भैय्या ( जी)
संध्याकाळी मुळ घाट-कोपरावर (पदावर ) आला की त्याला भैय्या नाही 'भाऊ' म्हणायचं 😉
Wednesday, February 26, 2025
मराठी भाषा दिन
मराठी भाषा दिन/ कवी कुसुमाग्रज जयंती निमित्य शुभेच्छा 💐💐
कुसुमाग्रजांना भेटायला मराठी भाषा आली आणि पुढे..
ओळखलंत का सर? स्वर्गात आलं कोणी
शब्द होते कोमजलेले , समजत नव्हती वाणी
क्षणभर बसली,नंतर हसली, बोलली वरती पाहून
'परकी भाषा' पाहुणी आली,गेली कायमची राहून
थँक्यू, हॅपी , सॅड म्हणत चार समुहात नाचली
कशी बशी माय मराठी ' RIP' तून वाचली
काॅपी केली, पेस्ट झाले, स्वत:चे स्वाहा झाले
आशय,वृत,छंदाचे तीन तेरा वाजले
'अभिजात' ला घेऊन संगे, सर आता लढते आहे
पडकी बाजू बांधते आहे,चिखल द्वेष गाडते आहे
'शब्दकोशा'कडे नजर जाताच,हसत हसत बोलली
शब्द नकोत सर, पण काळजी जरा वाटली
मोडून पडली भाषा, पण मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेऊन, Go ahead म्हणा
#माझी_फुसकुंडी 📝
२७/०२/२५
अमोल
Monday, February 24, 2025
मर्सी डे ज
मला अजूनही आठवतंय, आमच्या शाळेत स्नेहसंमेलनाच्या वेळेला विद्यार्थी/ विद्यार्थीनी प्रतिनिधी हे पद असायचे. विद्यार्थी प्रतिनिधी हा १० वी चा ( १० वी पर्यंतची शाळा होती), साधारण 'क' किंवा 'ड' तुकडीचा, १-२ वर्ष १० वी तच राहिलेला, असा तगडा उमेदवार या पदासाठी इच्छूक असायचा.
५ वी ते १० वी तील प्रत्येक तुकडीतील विद्यार्थी प्रतिनिधी, मुख्य प्रतिनिधीची निवड करायचे
मग हा आमचा इच्छुक, प्रत्येक प्रतिनिधीला २ चाॅकलेट देऊन स्वतःसाठी स्नेहसंमेलन विद्यार्थी प्रतिनिधी हे पद सहज मिळवायचा.
*'पद' मिळवायला २ चाॅकलेट मधे काम व्हायचे असे 'मर्सी डे' ज होते शाळेतले.*
#माझी_फुसकुंडी 📝
#सिटी_हायस्कूल_सांगली
२४/०२/२५
Saturday, January 25, 2025
Wednesday, January 22, 2025
माझी_फुसकुंडी
कलियुगातील कुंभमेळ्यात
भक्तांना गावली मोनालिसा
सेल्फी काढून घेण्यासाठी
खाली करतायत स्वतःचा खिसा 😁
#माझी_फुसकुंडी📝
२३/०१/२५



.jpeg)
.jpeg)












